विकसित भारताच्या ध्येयासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण अनिवार्य – राजे अंब्रिशराव आत्राम
सिरोंचा :- देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करत माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी केले. कार्य करताना प्रथम देश, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हा दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सिरोंचा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-2026’ अंतर्गत मंडलस्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. नामदेव ऊसेंडी, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, कुमार अवधेशबाबा आत्राम, सत्यनारायण मंचलवार, तालुका अध्यक्ष श्रीनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संतोष पडालवार तसेच जनाब शारीक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा व मंडल पदाधिकारी, बूथ व शक्ती केंद्र प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

प्रशिक्षणादरम्यान कार्यविस्तार, पक्षाची कार्यपद्धती, बूथ व्यवस्थापन, शक्ती केंद्रांची जबाबदारी, आगामी निवडणुकांची तयारी तसेच सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या रणनीती यासह विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाचा इतिहास व वैचारिक अधिष्ठान यावरही चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, जनसंपर्क वाढवण्याचे मार्ग आणि शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले. याशिवाय संवादात्मक सत्रांमध्ये कार्यकर्त्यांनी आपले अनुभव मांडले आणि स्थानिक अडचणींवर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न केला.

या दोन दिवसीय प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांना नव्या उर्जेसह काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
#सिरोंचा #गडचिरोली #भाजपा #BJP #प्रशिक्षणमहाअभियान2026 #दीनदयालउपाध्याय #विकसितभारत #NewIndia #PoliticalNews #MaharashtraPolitics #राजकारण #कार्यकर्ते #LeadershipTraining #BoothManagement #GrassrootPolitics #BJPWorkers #IndiaDevelopment #DevendraFadnavis #NarendraModi #AmbreshraoAtram #NandivedhNews #LocalNews #MaharashtraNews
NandiVedh NEWS WEBSITE